Advertisement Advertisement

मेहकरात किराणा दुकान फोडले; टिनपत्रा उचकटून ५३ हजारांचा ऐवज लंपास….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील सोनाटी चौफुली रोडवरील सुदर्शन किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी धाडसी चोरी केली. दुकानाच्या पाठीमागील लोखंडी टिनपत्रा उचकटून आत प्रवेश करत चोरट्यांनी रोख रक्कम आणि किराणा माल असा एकूण ५३ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून, याप्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी वैभव गणेश नाईक (वय ३६, रा. गजानन नगर, मेहकर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता पाऊस सुरू असल्याने त्यांनी सोनाटी चौफुली रोडवरील सुदर्शन किराणा दुकान बंद करून ते घरी गेले होते.

दरम्यान, ३१ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तपासणी केली असता दुकानाच्या पाठीमागील लोखंडी टिनपत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे खाद्यतेल, ड्रायफ्रूट, सुपारी, साबण, हेअर ऑईल यासह इतर किराणा साहित्य चोरून नेले. तसेच दुकानाच्या गल्ल्यातील ९ हजार रुपयांची रोकडही लंपास केली. चोरी गेलेल्या मालाची किंमत आणि रोख रक्कम मिळून एकूण ५३ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. याशिवाय दुकानातील इतर साहित्याची नासधूस करून अंदाजे ५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५(अ), ३२४(४) व ३३४(१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चोरीचा पुढील तपास पोलीस हवालदार सुखदेव विक्रम ठाकरे करीत आहेत. दुकानाच्या परिसरातील हालचाली तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!