Advertisement Advertisement

लगीन करतो म्हणत जवळीक वाढवली; पोटात बाळ आलं, अन् पठ्ठ्यानं लग्नाला नकार दिला!

मलकापूर : (बुलडाणा कव्हरेज न्युज) लग्न करण्याचे आश्वासन देत महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे, नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवणे आणि नंतर लग्नास नकार देत धमकी दिल्याच्या आरोपावरून मलकापूर शहर पोलिसांनी ३५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, मलकापूर येथील ३८ वर्षीय महिलेने आरोपीविरुद्ध फिर्याद दिली आहे. आरोपी आकाश राजू टाक (वय ३५, रा. रामदेव बाबा नगर, मलकापूर) याने ५ ऑगस्ट २०२४ ते २५ मे २०२६ या कालावधीत लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप महिलेने केला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, महिलेने विरोध केला असतानाही आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार करण्याचे सांगितल्यावर आरोपीने लग्न करण्याचे, आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे तसेच नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या आश्वासनांवर विश्वास ठेवल्यामुळे महिलेने त्यावेळी पोलिसांत तक्रार केली नसल्याचे सांगितले आहे.

यानंतरही आरोपीकडून वारंवार लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप महिलेने केला आहे. या काळात महिला गर्भवती झाल्याचे तिच्या तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर महिलेने आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावला असता त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच अपमानास्पद वर्तन करून शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याशिवाय आरोपीने महिलेला पैसे देण्याची तयारी दर्शवली. मात्र, महिलेने पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अप. नं. ५६६/२०२६ अन्वये बीएनएसमधील कलम ६९, ३५६(२), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!