मलकापूर :(बुलडाणा कव्हरेज न्युज)आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या आदिशक्ती श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे गुरुवारी (२६ जून) विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. पालखीच्या आगमनाने संपूर्ण शहर विठ्ठलनामाच्या गजरात दुमदुमून गेले.
जाहिरात👆
श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर) येथून २४ जून रोजी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताबाईंची पालखी प्रस्थान झाली. धरणगाव येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार चैनसुख संचेती यांनी मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील आणि दिंडी प्रमुख हभप हरणे महाराज यांचा सत्कार करून संत मुक्ताबाईंचे दर्शन घेतले. यावेळी धरणगाव ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर पालखी जग्गूमामा ढाबा, पद्मश्री व्ही. बी. कोलते महाविद्यालय मार्गे मलकापूर शहरात दाखल झाली. शहरात प्रवेश करताच पालखीची विधिवत पूजा करण्यात आली तसेच जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
तहसील चौकात महसूल, पोलीस आणि नगरपालिकेसह विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार समाधान सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश, नगरपालिकेचे उपाध्यक्ष अनिलभाऊ गांधी, उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी, पुरवठा अधिकारी धनश्री हरणे, गटविकास अधिकारी वेदिका सजगाणे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर पालखी हनुमान चौक, टी-पॉईंट आणि टेलिफोन कॉलनी मार्गे छत्रपती शिवराय प्रतिष्ठान मराठा मंगल कार्यालय येथे पोहोचली. येथे पानसरे कुटुंबीयांच्या वतीने वारकरी आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
मलकापूर येथे मुक्काम केल्यानंतर २७ जून रोजी सकाळी संत मुक्ताबाईंची पालखी दाताळा-शेलापूर मार्गे बुलढाण्याकडे पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहे.












