मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):शहरात क्षुल्लक कारणावरून गंभीर मारहाणीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे बॅनर लावताना “तु आमच्यावर थुंकलास” या संशयावरून एका युवकावर बिअरच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी योगेश सुरेश गणबास (रा. संताजीनगर, मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वर महाले (रा. सुभाषचंद्र बोस नगर, मलकापूर) व त्याच्या एका साथीदाराविरोधात मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, १९ जानेवारी रोजी रात्री तहसील चौक परिसरात बॅनर लावण्याचे काम सुरू असताना योगेश गणबास यांच्या पाठीमागून अचानक बिअरची बाटली मानेवर मारण्यात आली. या हल्ल्यात ते जखमी झाले. वळून पाहिल्यानंतर आरोपी ईश्वर महाले व त्याच्या मित्राने चापटबुक्क्यांनी मारहाण केल्याचे निष्पन्न झाले.
मारहाणीचे कारण विचारले असता, “तु कोलते कॉलेजमध्ये बॅनर लावताना आमच्यावर थुंकलास” असा आरोप आरोपींनी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याच रागातून आरोपीने पाठलाग करत मागून येऊन बिअरच्या बाटलीने हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी अप. नं. ३३/२०२५ अन्वये कलम ११८(१), ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.












