चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील शेलगाव जहागीर येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचं काम तब्बल दोन वर्षांपासून रखडलेलं असून गावकऱ्यांना पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. १२ महिन्यांत पूर्ण होणारी ही योजना तब्बल २३ महिने उलटूनही अर्धवट अवस्थेतच असल्याने गावकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जाहिरात 👆
या प्रकरणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर पाणी पुरवठा विभागाला जाग आली आहे. ग्रामपंचायतीकडून वारंवार तोंडी व लेखी मागणी करूनही कंत्राटदाराकडून कामास सुरुवात न झाल्याने सरनाईक यांनी उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग चिखली यांच्याकडे ठोस मागणी केली होती.
शेलगाव जहागीर येथे पाणी टाकी, पाईपलाईन व इतर मंजूर कामे अर्धवट असल्याने भविष्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. वेळेत काम पूर्ण झाल्यास गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळणार असून अनेक वर्षांची समस्या मार्गी लागणार आहे.
दरम्यान, या मागणीची दखल घेत पाणी पुरवठा विभागाकडून संबंधित कंत्राटदारास तात्काळ काम सुरू करण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंत्यांनी दिले आहे.
काम सुरू होणार की पुन्हा फक्त आश्वासनच मिळणार, याकडे आता संपूर्ण शेलगाव जहागीर गावाचं लक्ष लागलं आहे.














