खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील टेंभूर्णा येथील गावरान शिवारात रानडुकराने घातलेल्या थरारक हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात नेहमीप्रमाणे काम करत असताना रानडुकराने अचानक हल्ला केल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
गीता गंगाधर काळणे (वय ६०, रा. टेंभूर्णा) या ११ जानेवारी रोजी शेतात काम करत असताना शेतालगत दडून बसलेल्या रानडुकराने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या अनपेक्षित हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.
मात्र जखमा गंभीर स्वरूपाच्या असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर गावरान परिसरात रानडुकरांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत असून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.














