बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)नांदुरा–जळगाव जामोद मार्गावर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास काळी-पिवळी (एम.एच. २८ एम ३०८६) उलटून भीषण अपघात झाला. जळगाव जामोद येथून अवैधरित्या प्रवासी घेऊन नांदुऱ्याकडे येणाऱ्या या वाहनाचे निमगाव फाट्याजवळ चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन रस्त्यालगतच्या खड्यात कोसळले.
या अपघातात वाहनातील १३ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.
या अपघातात प्रणीती महेंद्र वानखडे (१७, रा. अकोली, ता. जळगाव जामोद), शाहीस्ता महमुद खान (२०), फरीदा महमुद खान (४०), अमान महमुद खान (१०), शबनम पठाण (२०), महमुदखान बिस्मिल्लाह खान (५३), भुसरा खान (१६), शाहीन जाकीर देशमुख (२४) सर्व रा. सुरत, तसेच अक्षरा संतोष तेलंग (७), अन्नपूर्णा संतोष तेलंग (३८), संतोष रुस्तम तेलंग (४५) रा. पिं. राजा, अंजना अशोक तायडे (६७) व अशोक निनाजी तायडे (७२) रा. नांदुरा हे जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून जखमींना नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.












