वाघ आला रे वाघ आला… तोही बुलढाण्यात!आता ज्ञानगंगेच्या जंगलात ‘वाघोबा’ची डरकाळी….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा जिल्ह्याच्या समृद्ध वनसंपदेला साजेशी आणि वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साह निर्माण करणारी महत्त्वाची घटना समोर आली आहे. वन्यजीव विभागाने अन्नसाखळीतील प्रमुख घटक असलेल्या वाघाचे ज्ञानगंगा अभयारण्यात यशस्वी पुनर्वसन केले आहे. ३ जानेवारीच्या रात्री पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या ‘पीकेटी-७-सीपी-१’ या तीन वर्ष वयाच्या नर वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात मुक्त करण्यात आले. त्यामुळे आता बुलडाणा–खामगाव मार्गावरील बोचा घाट परिसरात वाघोबाची डरकाळी ऐकू येणे नवल ठरणार नाही.

पांढरकवडा (यवतमाळ) येथील मूळ असलेला हा नर वाघ अवघ्या सहा महिन्यांचा असताना आईला मुकला होता. त्यानंतर त्याला व त्याच्या बहिणीला (मादी वाघ) पेंच व्याघ्र प्रकल्पात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली वाढवण्यात आले. गेल्या तीन वर्षांत या वाघाने शिकार करणे व जंगलात स्वतंत्रपणे जगण्यासाठी आवश्यक सर्व कौशल्ये आत्मसात केली. पूर्णपणे सक्षम झाल्यानंतर त्याच्या पुनर्वसनासाठी ज्ञानगंगा अभयारण्याची निवड करण्यात आली.

यापूर्वी टिपेश्वर अभयारण्यातून आलेला ‘सी-१’ हा वाघ तब्बल १३०० किमी अंतर कापून ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला होता. काही काळ वास्तव्यानंतर तो मादीच्या शोधात पुढे निघून गेला. या पार्श्वभूमीवर वनविभागाने नियोजनबद्ध पद्धतीने नव्या नर वाघाचे पुनर्वसन केले आहे.

पुनर्वसनानंतर सुरुवातीच्या काळात या वाघाला अभयारण्यातील सुमारे ५ हेक्टरच्या विशेष क्षेत्रात ठेवण्यात आले आहे. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही व ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून वनकर्मचाऱ्यांची गस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. वाघाच्या सुरक्षिततेसह परिसरातील मानवी वस्तीच्या दृष्टीनेही आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

ज्ञानगंगा अभयारण्य वाघांच्या अधिवासासाठी अत्यंत पोषक मानले जाते. सुमारे २०५ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्यात रोही, सांबर, रानडुक्कर, भेडकी, काळवीट व मोर यांसारख्या तृणभक्षी प्राण्यांची मोठी संख्या आहे. ‘देकारी’ गावाचे पुनर्वसन पूर्ण झाल्याने या भागात मानवी हस्तक्षेप नाही. यापूर्वी २०२० मध्ये ‘टी-१-सी-१’ वाघाने येथे सुमारे नऊ महिने वास्तव केल्याचा अनुभवही सकारात्मक ठरला आहे.

दरम्यान, या नर वाघाच्या बहिणीला (मादी वाघ) पैनगंगा अभयारण्यात सोडण्याची कार्यवाहीही वनविभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

पुनर्वसनावेळी उपस्थित अधिकारी:

अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी मागुलवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवि खोब्रागडे, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी दिपेश लोखंडे व प्रकाश सावळे, तसेच संजय राठोड, श्रीकृष्ण बोबडे, अरुण घुईकर, समाधान गुगळे यांच्यासह वनरक्षक व मदतनीस उपस्थित होते.

ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाच्या पुनरागमनामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या वनवैभवात नवा अध्याय जोडला गेला असून, वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!