अल्पवयीनाच्या हातात ट्रॅक्टर; उलटून दबला अन् जीव गेला..! मालकावर गुन्हा दाखल…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): वाहन चालविण्याची परवानगी नसतानाही अल्पवयीन मुलाच्या हाती ट्रॅक्टर देण्यात आल्याने घडलेल्या अपघातात एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर मालकावर डोणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास डोणगावजवळील आरेगाव माळ परिसरात एमएच २८ टी ८७०९ क्रमांकाचा ट्रॅक्टर चालवत असताना अल्पवयीन ऋषिकेश किरण भुतेकर (वय १७ वर्षे ७ महिने) याचा ताबा सुटला. ट्रॅक्टर नालीत घसरून उलटला आणि तो ट्रॅक्टरखाली दबला. गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

मृतकाचे वडील दत्ता पुंजाजी भुतेकर यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक पवन अरुण काळे (रा. डोणगाव) याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास दिल्याने व त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, डोणगाव परिसरात रात्रीच्या वेळी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा असून, यासाठी अल्पवयीन मुलांचा चालक म्हणून वापर केला जात असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून अवैध वाहतुकीवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!