नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शेगाव तालुक्यातील कठोरा येथे विवाहितेच्या जिवावर उठणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीसह सासरच्या लोकांनी संगनमताने विवाहितेचा गळा दाबून तिला उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजल्याचा गंभीर प्रकार ९ डिसेंबर रोजी घडला. उपचारानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी १ जानेवारी रोजी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रतीक्षा उज्वल लाहुडकार (वय २०) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. ती अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे राहत असून काही दिवसांपूर्वी शेगाव तालुक्यातील कठोरा येथील सासरी आली होती. याचदरम्यान ९ डिसेंबर रोजी सासरच्यांनी तिच्यावर अमानुष अत्याचार केला. सासरचे लोक वारंवार छळ करीत असल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारीनुसार, सासरा व दीर यांनी प्रतीक्षाचे हातपाय पकडले, तर सासूने उंदीर मारण्याच्या औषधाची पुडी कपात टाकली. यानंतर पतीने प्रतीक्षाचा गळा दाबत जबरदस्तीने तिच्या तोंडात विष ओतले. या घटनेत प्रतीक्षाचा जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. गंभीर अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारानंतर १ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी पती उज्वल रमेश लाहुडकार (वय ३०), सासरा रमेश लाहुडकार (वय ६०), दीर ज्ञानेश्वर उर्फ मुन्ना रमेश लाहुडकार (वय २०) व सासू शोभा रमेश लाहुडकार (वय ५५) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, १५, ११५(२), १५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरवाडे करीत आहेत.











