मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): संशय… हाच तो वाळवीसारखा कीडा, जो हसतं-खेळतं कुटुंब आतून पोखरतो आणि शेवटी त्याचं रूपांतर भीषण हत्याकांडात होतो. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम पतीने स्वतःच्या हाताने आपल्या संसाराची राख केल्याची संतापजनक घटना मेहकर शहरात घडली आहे. या अमानुष कृत्यात पत्नी आणि अवघ्या चार वर्षांच्या पोटच्या गोळ्याचा कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला.
मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी येथे राहणारा राहुल हरी मस्के (वय ३३) याचा विवाह रुपाली (वय २८) हिच्याशी झाला होता. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. त्यांच्या संसारात रियांश नावाचा चिमुकला जन्माला आला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राहुलच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबाबत संशयाचे विष पसरू लागले. याच संशयातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
पहाटे सैतान जागा झाला…..
२९ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर, पहाटे सुमारे दोन वाजताच्या सुमारास संपूर्ण परिसर झोपेत असताना राहुलच्या मनातील राक्षस जागा झाला. रागाच्या भरात हातात कुऱ्हाड घेत त्याने झोपेत असलेल्या पत्नी रुपाली आणि निरागस रियांशच्या डोक्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात माय-लेकांचा आक्रोश कायमचा शांत झाला आणि एका सुखी कुटुंबाचा भीषण अंत झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांची धाव….
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधला. पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे यांनी तातडीने घटनास्थळ गाठत आरोपी राहुलला अटक केली.
गंभीर जखमी रुपालीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चार वर्षांच्या रियांशचा मृतदेह मेहकर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
समाजाला हादरवणारी घटना….
ज्या लेकराला बापाच्या मायेची सर्वाधिक गरज होती, त्याच लेकरावर बापाने कुऱ्हाड चालवली. संवाद तुटलेल्या नात्यांमध्ये जेव्हा संशय घर करतो, तेव्हा त्याचा शेवट किती भयावह असू शकतो याचं हे अंगावर काटा आणणारं उदाहरण आहे.
कुटुंबात वाद, संशय किंवा तणाव जाणवत असेल, तर वेळीच समुपदेशन व हस्तक्षेप होणे अत्यावश्यक आहे; अन्यथा असे राक्षसी कृत्य समाजाला पुन्हा पुन्हा पाहावे लागतील.












