मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका विवाहित महिलेचा विनयभंग करून तिला व तिच्या पतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना २३ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने दोन्ही गटातील एकूण सात जणांविरुद्ध बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदुरा तालुक्यातील एका गावातील ३३ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास भारत बळीराम सुरडकर, जयश्री भारत सुरडकर, बळीराम चांगो सुरडकर व कस्तुराबाई बळीराम सुरडकर हे चौघे तिच्या घरासमोर आले. “आमच्या घरासमोर घाण टाकू नका, घरात लहान मुले असून आजारी पडतील,” असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. यावेळी भारत सुरडकर याने तिचा विनयभंग करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या पतीलाही मारहाण करण्यात आली.
या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, दुसऱ्या गटातील २३ वर्षीय विवाहितेने दिलेल्या प्रतितक्रारीनुसार, २३ डिसेंबर रोजी दुपारी दीड ते बारा वाजेदरम्यान ती घरी असताना तानाजी माणिक इंगळे हा तिच्या घरात आला व “तू माझ्या बहिणीला का मारले?” असे म्हणत तिचा विनयभंग केला. यावेळी फिर्यादीची सासू धावत आल्याने आरोपीने तेथून पळ काढला.
यानंतर फिर्यादी व तिची सासू मंगला भास्कर सुरडकर यांच्या घरी गेले असता मंगला सुरडकर व भास्कर सुरडकर यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच जयश्री सुरडकर, बळीराम सुरडकर व कस्तुराबाई सुरडकर यांनीही शिवीगाळ केली, तर भारत सुरडकर याने पुन्हा विनयभंग करीत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रतितक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.











