रायपुर (बुलडाणा कव्हरेज न्युज):वाघापूर शिवारातील शेतात मोटारची वायर कापण्याच्या जुन्या वादातून शेजारील शेतकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेत एक महिला जखमी झाली असून, याप्रकरणी रविवारी रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघापूर येथील शेतकरी वैशाली संजय ठेंग यांनी शेजारील शेतकरी संतोष भगवान केवट, त्यांची पत्नी व मुलीविरोधात मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शेतातील पंप मोटारची वायर अज्ञात व्यक्तीकडून वारंवार कापली जात होती. या प्रकाराला आळा घालण्यासाठी २१ डिसेंबर रोजी त्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरा बसवत असताना संतोष केवट अचानक धावत येत थेट हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात वैशाली ठेंग जखमी झाल्या. यावेळी संतोष केवट यांची पत्नी व मुलीनेही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.











