शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील जगदंबा नगर भागात १८ डिसेंबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान १५ वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अपहरण झालेल्या मुलाचे नाव अमन कपिल दाभाडे (वय १५) असे आहे. याप्रकरणी त्याची आई प्रतिभा कपिल दाभाडे (वय ३५, रा. तिवान टाकळी, सध्या रा. जगदंबा नगर, शेगाव) यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञात व्यक्तीने अमनला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनचा रंग गोरा, उंची सुमारे ४.५ फूट, बांधा पातळ, केस काळे आहेत. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट व पांढऱ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातली होती. या वर्णनाशी जुळणारा मुलगा कुणाला दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. संजय करुटले करीत आहेत. मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.











