चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)
चिखली तालुक्यातील रामानंद नगर येथील हॉटेल व्यावसायिक दिलीप राजाराम मोरे (वय ४५) यांचा मृतदेह दिवठाणा नदीत आढळून आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मोरे हे २८ सप्टेंबर रोजी किराणा आणण्यासाठी घरातून बाहेर पडले होते, मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर ३० सप्टेंबर रोजी चिखली पोलिस ठाण्यात बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली होती.
चार दिवसांपासून गायब असलेले मोरे यांचा मृतदेह नदीत सापडल्याने हा अपघात आहे, आत्महत्या आहे की घातपात? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
सध्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. या अनाकलनीय मृत्यूमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे, तर नातेवाईक व परिचितांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.











