बुलडाण्यात एसपी तांबेंच्या नेतृत्वात मोठी कारवाई: १९ घातक शस्त्रे, ८ लाखांचा गुटखा जप्त, ४५ वॉरंट बजावले

बुलडाण्यात एसपी तांबेंच्या नेतृत्वात मोठी कारवाई: १९ घातक शस्त्रे, ८ लाखांचा गुटखा जप्त, ४५ वॉरंट बजावले

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाण्याचे नवे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. २८ जून २०२५ रोजी पहाटे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या सर्व ३३ पोलीस स्टेशनांच्या हद्दीत एकाच वेळी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले. या धडक कारवाईत १९ घातक शस्त्रे, ८ लाख ३२ हजार ७३४ रुपयांचा गुटखा आणि इतर बेकायदा साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, ४५ वॉरंटची यशस्वी बजावणी करण्यात आली.

या ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील विविध भागांतून चार आरोपींकडून तलवारी, कोयते, चाकू, कुन्हाड आणि सुरे यांसारखी १९ घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली. खामगाव ग्रामीण, जानेफळ आणि हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन शस्त्रसंबंधी गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये आरोपी अनिल भोसले आणि हनुमान पवार यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या घरातून शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय, जळगाव जामोद, रायपूर, मेहकर आणि साखरखेर्डा येथे काही गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

“साहेब, हा घ्या पुरावा!” ट्रॅफिक पोलिसांच्या संरक्षणातच चिखलीत वाळू माफियांना मोकळा राज?

गुटखा तस्करीवरही या कारवाईत मोठा आघात करण्यात आला. मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी गुटखा वाहतूक करणारी एक स्विफ्ट डिजायर कार पकडली. या कारमधून विमल पान मसाला, पान बहार आणि तंबाखूसह १ लाख ६२ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ८ लाख ३२ हजार ७३४ रुपयांचा बेकायदा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.

वॉरंट बजावणीच्या दृष्टीनेही ही कारवाई यशस्वी ठरली. या ऑपरेशनदरम्यान २३ बिनजामिनती आणि २२ जामिनावर सुटण्यायोग्य वॉरंट बजावण्यात आले. या मोहिमेत ३९ पोलीस अधिकारी, २७५ पोलीस कर्मचारी आणि ५ सीआरपी पथकांनी सहभाग घेतला. सर्व पथकांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध रीतीने ही कारवाई यशस्वी केली.

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी या यशस्वी ऑपरेशनबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. “गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा धडक कारवाया यापुढेही सुरू राहतील. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांबद्दल विश्वास आणि आदर निर्माण झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “बुलडाण्यात एसपी तांबेंच्या नेतृत्वात मोठी कारवाई: १९ घातक शस्त्रे, ८ लाखांचा गुटखा जप्त, ४५ वॉरंट बजावले”

Leave a Comment

WhatsApp Join Group!