Advertisement Advertisement

फायनान्स कंपन्यांवर निर्बंध घाला, अन्यथा महाराष्ट्रात एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही! नांदेड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक; फायनान्स कंपनीच्या मालकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या पद्धतीवरून राज्यातील वातावरण तापले असतानाच नांदेड येथील एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी फायनान्स कंपनीच्या मालकांसह संचालकांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच खासगी फायनान्स आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांवर राज्य सरकारने तातडीने निर्बंध घालावेत, अन्यथा महाराष्ट्रात या कंपन्यांचे एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही, असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे.

नांदेड येथील घटनेबाबत बोलताना तुपकर यांनी संबंधित शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले, तरी या मृत्यूमागील परिस्थितीची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले. हा प्रकार फायनान्स कंपनीच्या वसुलीशी संबंधित असल्याचा आरोप करत त्यांनी कंपनीच्या मालकांसह सर्व संचालक आणि संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे.

वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ कशासाठी? असा सवाल उपस्थित करत तुपकर यांनी खासगी फायनान्स कंपन्या, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि काही पतसंस्थांच्या वसुलीच्या पद्धतीवर जोरदार टीका केली. कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांना धमकावणे, दमदाटी करणे, अपमानास्पद वागणूक देणे तसेच वाहन किंवा ट्रॅक्टर रस्त्यात अडवून जप्त करण्यासारखे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. वसुलीसाठी गुंडांचा वापर केला जात असल्याचा आरोप करत या प्रकारांना राज्य सरकारने तातडीने आळा घालावा, अशी मागणीही त्यांनी केली.

खासगी फायनान्स कंपन्यांकडून ३० ते ४० टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जात असल्याचा दावा करत, एवढे व्याज आकारण्याचा अधिकार या कंपन्यांना कोणी दिला, असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री महोदयांनी या गंभीर प्रश्नात स्वतः लक्ष घालून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दुष्काळात वसुलीचा तगादा नको! बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जवसुलीपासून दिलासा देण्याची मागणी तुपकर यांनी केली आहे. दुष्काळाच्या काळात मायक्रो फायनान्स कंपन्या, खासगी फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात जाऊ नये, या काळातील व्याज माफ करावे, वसुलीला स्थगिती द्यावी आणि कर्जफेडीच्या अडचणींमुळे शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

राज्य सरकारने या कंपन्यांच्या मनमानी कारभारावर तातडीने निर्बंध घालून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण द्यावे. अन्यथा, खासगी फायनान्स आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रात त्यांचे एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही, असा स्पष्ट इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!