मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर येथील आयटीआय शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ५६ वर्षीय गजानन विठोबा वाघमारे यांचा मृत्यू झाल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी मेरा बु. येथे उघडकीस आली. शेतातील करंजीच्या झाडाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे कवठळ आणि मेरा बु. गावावर शोककळा पसरली आहे.
गजानन विठोबा वाघमारे हे अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवठळ येथील रहिवासी होते. ते मेहकर येथील एका आयटीआय शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. कवठळ शिवारात त्यांची सुमारे १५ ते १६ एकर शेती असून, त्यांनी चिखली येथे मोठे घर बांधले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी गजानन वाघमारे हे नेहमीप्रमाणे शाळेत गेले होते. मात्र, ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शेतमालक तूर पिकावर अळीच्या औषधाची फवारणी करण्यासाठी शेतात गेले असता त्यांना गजानन वाघमारे यांचा मृतदेह करंजीच्या झाडाजवळ आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील बद्रीप्रसाद पडघान, कोतवाल सचिन पडघान यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर अंढेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
गजानन वाघमारे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने नातेवाईक आणि परिचितांमधून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कवठळ आणि मेरा बु. परिसरात शोककळा पसरली आहे.















