देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पुण्यात नोकरीला रुजू होण्याची तयारी, डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्नं आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची उमेद… मात्र, नियतीच्या एका घावाने सारंच संपलं! देऊळगाव राजा शहरातील चिखली रोडवर १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण अपघातात वैष्णवी बद्रीनाथ घुगे (वय २४, रा. भगवान बाबा कॉलनी, देऊळगाव राजा) या उच्चशिक्षित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने घुगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चिखली रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोर रस्त्यालगत असलेल्या खांबाला कारची जोरदार धडक बसली. या धडकेनंतर कार पलटी झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वैष्णवी यांना नातेवाईकांनी देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात आणले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.
वैष्णवी घुगे ही उच्चशिक्षित तरुणी पुणे येथे एका कंपनीत नोकरीसाठी रुजू होण्याच्या तयारीत होती. नोकरीच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आई-वडिलांचे दर्शन घेण्यासाठी ती १७ ऑक्टोबर रोजी पुण्याहून देऊळगाव राजा येथे आली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी काळाने घाला घातला. पुण्यात नोकरी करून स्वतःचे भविष्य घडविण्याची तिची स्वप्ने या दुर्दैवी अपघातामुळे अपूर्ण राहिली. कुटुंबीयांसाठी आनंदाचा क्षण ठरणारी ही वेळ दुःखद घटनेत बदलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत गिते यांच्या वतीने कक्षसेवक अर्जुन भीकाजी नागरे यांनी पोलिसांना वैद्यकीय मेमो सादर केला. त्यानुसार, वैष्णवी यांना त्यांचे नातेवाईक दीपक विठ्ठल कायंदे यांनी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.५० वाजण्यापूर्वी मृतावस्थेत ग्रामीण रुग्णालयात आणले होते. या घटनेची देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश मांटे यांच्याकडे सोपविण्यात आला असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे.
वैष्णवीच्या अकाली निधनाने तिच्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच तिचा प्रवास थांबल्याने शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.












