Advertisement Advertisement

जिल्हा परिषदेच्या खुर्चीवर नवा अधिकारी ! गुलाबराव खरातांची बदली, भालचंद्र चव्हाणांची नियुक्ती; प्रशासकीय वर्तुळात खळबळ…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी भालचंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

गुलाबराव खरात हे बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळत होते. आता त्यांच्या बदलीनंतर या महत्त्वाच्या पदाची धुरा भालचंद्र चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या प्रशासकीय बदलामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजात नव्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल कशी होते, याकडे लक्ष लागले आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशावर विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांची स्वाक्षरी आहे. आदेशानुसार, गुलाबराव खरात यांनी त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार तातडीने स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील या बदलामुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांना आणि प्रशासकीय कामकाजाला कोणती दिशा मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!