अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा परिसरात बिबट्याच्या वावराची चर्चा सुरू असतानाच रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी रामेश्वर मंदिर परिसरातील शिवाजी नागरे यांच्या शेतात पुन्हा बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे. शिवाजी नागरे यांचे पुत्र अमोल नागरे यांना बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात सलग दुसऱ्यांदा बिबट्या दिसल्याची माहिती समोर आल्याने शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी रात्री रामेश्वर धरणाच्या वरील बाजूस असलेल्या तेजनकर यांच्या शेतात काही युवकांना बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली होती. रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकांना बिबट्या दिसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर रविवारी पुन्हा बिबट्या दिसल्याची माहिती समोर आल्याने परिसरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
वनविभागाची धाव; ड्रोनद्वारे शोधमोहीम….
बिबट्या दिसल्याच्या माहितीची दखल घेत वनविभागाच्या पथकाने ११ ऑक्टोबर रोजी रामेश्वर मंदिर परिसरातील शिवाजी नागरे यांच्या शेतासह लगतच्या जंगल भागाची पाहणी केली. बिबट्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातूनही परिसरावर लक्ष ठेवून शोध घेण्यात आला. यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी वनपाल विलास मेरत आणि वनरक्षक टेकाळे यांनी रामेश्वर धरणाच्या वरील बाजूस असलेल्या तेजनकर यांच्या शेतशिवाराची पाहणी केली होती.
शेतात जायचं तरी कसं? शेतकऱ्यांमध्ये धाकधूक!
शेतीच्या कामांसाठी शेतकरी आणि शेतमजुरांना अनेकदा सकाळी लवकर किंवा रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. अशा परिस्थितीत परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिकांना पाणी देणे, शेतीची इतर कामे करणे आणि शेतात ये-जा करताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे.
या पाहणीदरम्यान भास्कर हरिभाऊ तेजनकर, विशाल तेजनकर, विठ्ठल देशमुख, सुधाकर तेजनकर, भरत तेजनकर आणि मधुकर तेजनकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. बिबट्याचा ठावठिकाणा शोधून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वनविभागाकडून परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून, बिबट्याच्या वावराबाबत नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
















