Advertisement Advertisement

देऊळगाव घुबेच्या लेकींचा बुलढाणा जिल्ह्यावर दबदबा!जानकीदेवी विद्यालय, रामकृष्ण विवेकानंद स्कूलच्या मुलींचे जिल्हा विजेतेपद; दोन्ही संघांची विभागीय स्तरासाठी निवड…

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा तथा जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत देऊळगाव घुबे येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जानकीदेवी विद्यालय आणि रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुलींच्या संघांनी दणदणीत कामगिरी करत जिल्हा विजेतेपद पटकावले आहे. या दोन्ही विजेत्या संघांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

२६ सप्टेंबर २०२६ रोजी चिखली येथे ही जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली. यात १४ वर्षे वयोगटात जानकीदेवी विद्यालयाच्या, तर १९ वर्षे वयोगटात रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुलींनी दमदार सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात विजय मिळवत जिल्ह्याच्या व्हॉलीबॉल क्षेत्रात आपला ठसा उमटवला.

१९ वर्षे वयोगटात सलग पाचव्यांदा विजेतेपद…

रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने स्पर्धेत सलग तीन सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात खामगाव तालुक्याच्या संघाशी सामना झाला. चिखली तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत खामगाव संघावर एकतर्फी विजय मिळवला.

या विजयासह या संघाने बुलढाणा जिल्ह्यातील व्हॉलीबॉलवरील सलग पाच वर्षांचे वर्चस्व कायम राखले आहे. आता विभागीय स्तरावरील स्पर्धेतही दमदार कामगिरी करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे.

१४ वर्षे वयोगटातही जानकीदेवी विद्यालयाचा झेंडा….

जानकीदेवी विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघानेही स्पर्धेत शानदार कामगिरी केली. संघाने तीन प्रतिस्पर्धी संघांना एकतर्फी पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात मेहकर तालुक्याच्या संघासोबत झालेल्या लढतीत जानकीदेवी विद्यालयाच्या मुलींनी उत्कृष्ट सांघिक खेळ करत विजय मिळवला आणि जिल्हा विजेतेपदावर नाव कोरले.

या विजयामुळे १४ वर्षे वयोगटातील संघाचीही विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एकाच स्पर्धेत देऊळगाव घुबेच्या दोन मुलींच्या संघांनी जिल्हा विजेतेपद मिळवल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मान्यवरांकडून विजेत्या संघांचे अभिनंदन

स्पर्धेदरम्यान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे पाटील उपस्थित होते. यावेळी एल. एस. घुबे सर, क्रीडा शिक्षक गुंजकर सर, प्रा. रामेश्वर कऱ्हाडे सर, क्रीडा शिक्षक नेमाने सर यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी दोन्ही विजेत्या संघांचे अभिनंदन करत खेळाडूंच्या उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे कौतुक केले. या उल्लेखनीय यशाबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. शेणफडरावजी घुबे, सचिव प्रा. उद्धवराव घुबे, माजी प्राचार्य श्री. एच. जी. घुबे आणि प्राचार्य श्री. बी. बी. लांडगे यांनी विजेत्या खेळाडू तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले.

जिद्द, मेहनत, शिस्त आणि सांघिक खेळाच्या जोरावर देऊळगाव घुबेच्या मुलींनी जिल्हास्तरावर मिळवलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद असून, विभागीय स्तरावरही दोन्ही संघ देऊळगाव घुबेचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!