चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाला अखेर ऐनवेळी ब्रेक लागला. २२ सप्टेंबर रोजी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी झालेली असतानाच बोंद्रे यांनी आपला निर्णय बदलत काँग्रेसमध्येच राहण्याची भूमिका स्पष्ट केली. या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर दिल्ली दौरा करून चिखलीत परतलेल्या बोंद्रे यांचे गुरुवारी समर्थकांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत जल्लोषात स्वागत केले.
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू होती. २० सप्टेंबर रोजी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे या प्रवेशाकडे लक्ष लागले होते.
मात्र, पक्षप्रवेशाच्या आदल्या रात्री या राजकीय घडामोडींना अचानक वेगळे वळण मिळाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मागे घेत काँग्रेससोबतच राहण्याची भूमिका स्पष्ट केली.
दिल्ली दौऱ्यानंतर चिखलीत समर्थकांचा जल्लोष….
या घडामोडीनंतर राहुल बोंद्रे दिल्लीला रवाना झाले होते. दिल्ली दौऱ्यानंतर चिखलीत परतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत स्वागत केले. बोंद्रे यांच्या भूमिकेने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.
स्वागतानंतर माध्यमांशी संवाद साधताना बोंद्रे यांनी आगामी राजकीय भूमिकेबाबत स्पष्ट संकेत दिले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांच्या झालेल्या भेटी या पूर्वनियोजित आणि आधीच निश्चित झालेल्या होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
“आता राहुलजींसोबत संघर्ष करत राहायचं ठरवलंय….
आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत बोलताना राहुल बोंद्रे यांनी, “आता राहुलजींसोबत संघर्ष करत राहायचं ठरवलं आहे,” अशी भूमिका मांडली. देशातील गोरगरीब जनता, शेतकरी आणि देशाच्या हितासाठी भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. “राहुलजींसोबत या संघर्षात आम्ही आहोत,” असेही बोंद्रे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजप प्रवेशाच्या चर्चेदरम्यान आपल्यावर कोणता राजकीय दबाव होता का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. “तो मागचा विषय आहे. त्यावर न बोलता मला पुढे जायचं आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आधीच्या भूमिकेमुळे चिखलीच्या राजकारणात चर्चेला उधाण….
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. विशेषतः चिखलीतील बोंद्रे आणि भाजपच्या विद्यमान आमदार श्वेता महाले यांच्यातील पूर्वीच्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पक्षप्रवेशानंतर स्थानिक राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र, भाजप प्रवेशाच्या काही तास आधीच बोंद्रे यांनी निर्णय बदलल्याने या संपूर्ण घडामोडीला वेगळे वळण मिळाले. आता बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच राहण्याची भूमिका स्पष्ट केल्याने चिखलीतील काँग्रेसची आगामी राजकीय दिशा, संघटनात्मक भूमिका आणि बोंद्रे यांची पुढील राजकीय वाटचाल काय असेल, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














