देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार सुरळीत ठेवण्यासाठी देऊळगाव राजा तालुक्यातील तब्बल २६ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित ग्रामपंचायतींचा दैनंदिन कारभार नियुक्त शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालणार आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय सातत्य राहावे, नागरिकांना मिळणाऱ्या स्थानिक सेवा सुरळीत सुरू राहाव्यात तसेच विकासकामांच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याची तसेच स्थानिक पातळीवरील सेवा आणि विकासकामे सुरळीत सुरू ठेवण्याची जबाबदारी प्रशासकांवर सोपविण्यात आली आहे.
या प्रशासकांच्या नियुक्तीमध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, पंचायत, विस्तार अधिकारी तसेच एकात्मिक बालविकास सेवा विभागातील शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नियुक्त अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार स्वीकारून आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या २६ ग्रामपंचायतींचा समावेश….
मंडपगाव, डोड्रा अंढेरा, पळसखेड झालटा, वायगाव बु., गिरोली खुर्द, जवळखेड, चिखली बु., पिंपळगाव बु., बोरेखेडी बावरा, मेहुणाराजा, उंबरखेड, खळ्याळ गव्हाण, सावखेड नागरे, शिवणी आरमाळ, नागणगाव, पांगरी, आळंद, मेडगाव, पाडळी शिंदे, टाकरखेड, देऊळगाव मही, सावखेडभाई, निमगाव गुरु, पिंपरी आंधळे आणि तुळजापूर या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय कामकाज ठप्प होऊ नये, नागरिकांची कामे रखडू नयेत आणि सुरू असलेल्या विकासकामांना खीळ बसू नये, यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता संबंधित २६ ग्रामपंचायतींचा कारभार नियुक्त प्रशासकांच्या देखरेखीखाली सुरू राहणार आहे.















