सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – कुंबेफळ येथील नीलेश प्रकाश चव्हाण (वय ३०) या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ९ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःच्या आईला फोन करून आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती.
जाहिरात ☝️
या घटनेमुळे गावात आणि चव्हाण कुटुंबात शोककळा पसरली आहे.नीलेश चव्हाण याने बीबी शिवारातील उंबर मळा परिसरात असलेल्या नाल्याजवळील झाडाला दोरीने गळफास घेतला. त्याने आत्महत्या करण्याआधी आईला फोन करून आपली कळकळ व्यक्त केली होती. आईने ही माहिती मिळताच कुटुंबीय व नातेवाईकांनी तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळातच तो झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.तातडीने त्याला बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी रोशन रमेश चव्हाण यांच्या तोंडी तक्रारीवरून बीबी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नीलेशने आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय का घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास सुरू असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.