वळती (बुलडाणा कव्हरेज न्युज): नवीन वर्षाच्या पहिल्याच टप्प्यात वळती ग्रामपंचायतीने धाडसी आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेत गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या समस्येला हात घातला आहे. गावात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने भटक्या श्वानांची नसबंदी करण्याची विशेष मोहीम राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
तालुक्यातील वळती गावात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक तसेच गोठ्यातील वासरे व शेळ्या यांच्यावर हल्ल्याच्या घटना घडत होत्या. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक बनले होते. गाव शिवारात व रस्त्यांवर कुत्र्यांच्या झुंडी दिसू लागल्याने शेतात ये-जा करणेही कठीण झाले होते. अनेक पालकांनी भीतीपोटी मुलांना घराबाहेर सोडणे बंद केले होते.
या गंभीर समस्येची दखल घेत वळती ग्रामपंचायतीने पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मंगेश गाडे यांच्या सहकार्याने भटक्या कुत्र्यांची शास्त्रीय पद्धतीने नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमुळे कुत्र्यांची संख्या टप्प्याटप्प्याने नियंत्रणात येईल, तसेच गावकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळेल, असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.
हा महत्त्वपूर्ण निर्णय सरपंच सुनील चिंचोले यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला असून गटविकास अधिकारी समाधान वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायत अधिकारी अभय पाटील वळती ग्रामपंचायत हद्दीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून सर्वत्र कौतुक आणि स्वागत होत आहे.
नवीन वर्षात सुरू होणारी ही नसबंदी मोहीम यशस्वी ठरल्यास वळती गाव भटक्या कुत्र्यांच्या समस्येतून मुक्त होईल, तसेच गावकऱ्यांना सुरक्षित, शांत आणि भयमुक्त वातावरण मिळेल, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.













