बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई सुरू असताना महसूल कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे मंगळवार, २० जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास तलाठी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली.
रायपूर येथे कर्तव्यावर असलेल्या ग्राम महसूल अधिकारी उषा संतोष देशमुख व त्यांच्या सहकारी भाग्यशाली गजेंद्र गिरी यांनी विना नंबरच्या, रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रॅक्टर थेट त्यांच्या अंगावर आणून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर मुरडकर याच्याविरुद्ध रायपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर व १ ब्रास रेती असा सुमारे ३ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२१, २०३ (२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या सहकलम ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपीला अद्याप अटक न झाल्याने पटवारी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला असून अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.












