पिंपळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):
येथील मराठी प्राथमिक मुलांच्या शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात 👆
२३ जानेवारी रोजी शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा पवन नारायण इंगळे (वय १०) याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने शिक्षक विलास चिम (रा. जळका भडंग) यांनी विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्याचे वडील नारायण देविदास इंगळे (वय ३७) यांनी फिर्यादीत केला आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
विद्यार्थ्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल व फिर्यादीचा जबाब नोंदवून पिंपळगाव राजा पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१) तसेच बाल न्याय (अल्पवयीन मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, शाळा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. प्रकरणाची माहिती शिक्षण विभाग व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असून चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार भागवत मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव राजा पोलिस करीत आहेत.












