बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक शिवारात शेतात खोदलेली विहीर कागदोपत्री चक्क गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातबारा उताऱ्यावरून तलाठ्याने विहिरीची नोंद काढून टाकल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा येथील रहिवासी प्रल्हाद बजेबा पंजरकर यांचे मेरा बुद्रूक शिवारात गट नंबर ५९१ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी नियमाने विहीर खोदलेली असून ती आजही प्रत्यक्ष जागेवर अस्तित्वात आहे. मात्र सातबारा उताऱ्यातून तलाठ्याने विहिरीची नोंद काढून टाकल्याचे उघड झाले.
सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठ्याकडे गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत जाब विचारल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. विहिरीची नोंद पुन्हा घेण्यासाठी तलाठी व मंडळ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
याप्रकरणी पंजरकर यांनी ४ डिसेंबर रोजी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. मात्र तहसीलदारांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
माझी विहीर आजही शेतात प्रत्यक्ष आहे, पंचनामा करून खात्री करावी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून तलाठी व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच सातबारा उताऱ्यावर विहिरीची नोंद पुन्हा टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी प्रल्हाद पंजरकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.














