मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) क्षुल्लक कारणावरून सख्या भावाच्या कुटुंबाला मारहाण केल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कुऱ्हा येथे घडली. प्रकरणी तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांत एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कुऱ्हा येथील केरासिंग राजाराम नोळे यांनी धामणगाव बढे पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी आणि त्यांचा सख्खा भाऊ ईश्वरसिंग राजाराम नोळे यांच्यामध्ये ट्रॅक्टरच्या पैशांवरून वाद सुरू आहे. दरम्यान काल ९ ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ
दारू पिऊन आला आणि ट्रॅक्टरची चावी मागितली. यावेळी फिर्यादीने सांगीतले तु दारू पिऊन आला आहे, तुला चावी देत नाही असे म्हटले. यावरून ईश्वरसिंग नोळे याने फिर्यादीस चापटबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या मुलाने भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली. यादरम्यान त्याला काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादीच्या पत्नीला लोटपाट करून चापटबुक्क्यांनी मारहाण केली असून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी ईश्वरसिंग नोळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ शरद बाठे हे करीत आहेत.











