दुसरबीड(बुलडाणा कव्हरेज न्युज):राहेरी येथील उढेगाव फाटा परिसरातील ऐतिहासिक लाँगमार्च नामांतर संघर्षभूमी परिसरात वाळूमाफियांकडून सुरू असलेल्या बेकायदा रेती उपशाविरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. अवैध रेती उत्खननामुळे पाणीपातळी झपाट्याने घटत असून, भविष्यात भीषण पाणीटंचाईचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आज सकाळी मुंबई–नागपूर ७५३ सी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू झालेले आंदोलन तब्बल दोन तास चालले. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवासी व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला. महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने थेट दुसरबीड येथील रेती घाटावर धाव घेत दोन पोकलेन, दोन बोटी व टिप्पर जप्त केले. चौकशी पूर्ण होईपर्यंत रेती उपसा पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
ऐतिहासिक स्मारकाला धोका…..
राहेरी येथील पुलाजवळील संघर्षभूमी ही नामांतर लढ्याचे प्रेरणास्थान असून येथे स्मारकाचे काम सुरू आहे. मात्र वाळूमाफियांनी या पवित्र स्थळाजवळ रेतीचा साठा केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्मारक परिसराचे गंभीर नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पाणीटंचाईचा इशारा…
रेती उपशामुळे पाणीपातळी खालावत असून दुसरबीड, राहेरीसह सुमारे ४० गावांतील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यावर संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरांसाठीही पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही दखल न घेतल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले.
उपोषण सुरू….
या प्रकरणी कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मधुकर शिंदे व भिकाजी इंगळे यांनी आज सायंकाळपासून ऐतिहासिक स्मारकस्थळी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने भीम अनुयायी, शेतकरी, महिला व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
प्रशासन उपस्थित….
या कारवाईदरम्यान तहसीलदार अजित दिवटे, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र लांडगे, तसेच किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय … यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.













