रेती माफियांचा कहर! रेतीने केला घात;माफिया मोकाट…! रेतीमुळे दोन कार घसरल्या

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :अवैध रेती वाहतुकीमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मोताळा–नांदुरा मार्गावरील वरूड फाट्याजवळील पुलावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या रेतीमुळे दोन कार घसरून भीषण अपघात झाले. यातील एक कार थेट पुलावरून नदीत कोसळली. सुदैवाने एअरबॅग उघडल्याने चालकाचा जीव वाचला, तर दुसऱ्या कारमधील तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना २५ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरा येथून दोन कार बुलढाण्याकडे निघाल्या होत्या. मोताळा–नांदुरा रोडवरील वरूड फाट्याजवळील पुलावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनातून मोठ्या प्रमाणात रेती रस्त्यावर पडलेली होती. एमएच-०४-जीडी-८२४५ क्रमांकाची कार रेतीमुळे ब्रेक न लागल्याने थेट पुलावरून नदीत कोसळली. या कारमधील चालक अरुण राजगुरे हे एअरबॅग उघडल्याने सुदैवाने बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली.

दरम्यान, एमएच-१९-सीएप-००६९ क्रमांकाची दुसरी कार पावणेदहा वाजेच्या सुमारास वरूड फाट्यावरील वळणावर रेतीवर घसरून पुलाच्या कठड्याला धडकली. या कारमधील तीन जण जखमी झाले असून त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती वरूड येथील प्रसाद जुनारे, त्यांचे बंधू तसेच शेतकरी फाटे यांनी तत्काळ बोराखेडी पोलिसांना दिली.

माहिती मिळताच बोराखेडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेती साचलेली असल्याचे आढळून आले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले.

पुढील अपघाताचा धोका टाळण्यासाठी बोराखेडी एपीआय व पोलिसांनी हवेच्या प्रेशरवर चालणारे ब्लॅस्टिंग ट्रॅक्टर बोलावून रस्त्यावरील रेती साफ केली. या कामात पोलीस कर्मचारी बालाजी शेंगेपल्लू, पोलीस शिपाई नंदकिशोर धांडे, वैभव खरमडे, मनोहर पंडित, ज्ञानेश्वर धामोडे तसेच वरूड, तांदुळवाडी व शेंबा येथील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. मोताळा येथील सोपान धोरण, बाळू धोरण व त्यांच्या कुटुंबीयांनीही मदत केली.

तालुक्यात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू असून कारवाई टाळण्यासाठी रेती तस्करांकडून टिप्पर व इतर वाहने सुसाट वेगाने चालविली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे वारंवार अपघात होत असून जीवितहानीचा धोका वाढत आहे.

दरम्यान, रस्त्यावर रेती टाकणाऱ्या अज्ञात वाहनधारकाचा शोध घेणे हे महसूल व पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे. अवैध रेती वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!