धनुष्यबान सुटला.. घड्याळ थांबलं, तुतारी आडवी आली… 21 वर्षाच्या तरुण पोरांनी सत्ता उलथवली….”

सिंदखेडराजा :(बुलडाणा कव्हरेज न्युज)नगरपालिका निवडणुकीत सिंदखेडराजात राजकारणाचा पूर्ण खेळ उलटला. २० प्रभागांपैकी तुतारी ८ ठिकाणी वाजली, घड्याळ ६ ठिकाणी चालले, बाण धनुष्यातून सुटले पण वेद घेता आला नाही, तलाव परिसरात असूनही कमळ मात्र एकाच ठिकाणी फुलले! सौरभ तायडे या छाव्याने अवघ्या १६९ मतांनी नगराध्यक्षपद पटकावत इतिहास रचला.

काझी साहेबांचे बालेकिल्ले समजले जाणारे दोन प्रभाग फुटले, तर तिथेच घड्याळाचे काटे तुटले. सौरभला काझींच्याच प्रभागातून तब्बल ६७५ पेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे विजयानंतर रॅलीत बॅनर नसेल तर काय झळकणार, असा सवाल उपस्थित झाला.


शिवसेनेच्या आतिश तायडेंना राजकीय व कौटुंबिक पाठबळ होते. मागील १५ वर्षांपासून बाला घराण्याची नगरपालिका होती. केंद्रीय मंत्री, माजी आमदार, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. मात्र सतत रस्ते फोडणे, ड्रेनेज, नळपाणी यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. वर्षानुवर्षे कामे करूनही पाण्याची बोंबाबोंब कायम राहिल्याने मतदारांनी अँटी-इन्कमबन्सीचा फटका दिला.श्याम मेहत्रे हे ठरलेले उमेदवार असताना ऐन नामांकनाच्या दिवशी झालेल्या फोडाफोडीमुळे राष्ट्रवादीचा डाव फसला. आमदारांनीही ताकद लावली, मात्र अवघ्या ८५ मतांच्या गणितात राष्ट्रवादीचा ‘ड्राय डे’ झाला.

अशा परिस्थितीत विजय तायडेंनी आपल्या मुलगा सौरभला पुढे करण्याची जोखीम घेतली. रसायनशास्त्रात एम.एस्सी. केलेला, तरुणांचा मोठा गोतावळा असलेला सौरभ सोशल मीडियावर ७५ रिल्सच्या माध्यमातून थेट तरुणाईपर्यंत पोहोचला. “यंदा छावा लढणार, पुन्हा इतिहास घडणार” हा नारा तरुणांनी डोक्यावर घेतला.


अनेक घरात वडील वेगवेगळ्या गोटात असले तरी पोरं सौरभसोबत होती. बचतगटाच्या महिलांनी वर्गणी काढली. टेन्शन-फ्री देहबोली, शेवटच्या ओव्हरमध्ये सामना फिरवण्याचं कसब आणि झेन-झेडचा जोर यामुळे सिंदखेडराजात सत्ताबदल झाला नाही, तर पिढीबदल झाला.पत्रकाराने विचारले, “तुझ्याविरोधात दोन उपमुख्यमंत्री प्रचाराला आले होते?”त्यावर सौरभचे थोडक्यात उत्तर होते “यातच माझा विजय आहे!”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!