खामगावात आता मोकाट कुत्र्यांवर लगाम; नसबंदीची धडाकेबाज मोहीम सुरु..

खामगाव : (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिका, पशुसंवर्धन विभाग व पिपल फॉर अ‍ॅनिमल्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम जोरात सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागातून दररोज सरासरी २० मोकाट कुत्रे पकडून त्यांच्यावर नसबंदी करण्यात येत आहे.

गेल्या पंधरा दिवसांत तब्बल २५० मोकाट कुत्रे पकडण्यात आले असून, त्यांच्या नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. शहरातील रस्त्यांवर व वस्ती परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनाही घडत असल्याने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत होती.

नसबंदी शस्त्रक्रियेनंतर संबंधित कुत्र्यांना ४ ते ५ दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर ज्या भागातून त्यांना पकडण्यात आले होते, त्याच भागात पुन्हा सोडण्यात येत आहे. नसबंदी झालेल्या कुत्र्यांची ओळख पटावी यासाठी त्यांच्या एका कानावर व्ही आकाराची खुण करण्यात येत आहे.

दररोज २० कुत्रे पकडून तेवढ्याच कुत्र्यांची नसबंदी केली जात असून, गेल्या वर्षभरात सुमारे १ हजार मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. ही मोहीम सुरूच राहणार असून, यामुळे भविष्यात मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!