साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):येथून जवळच असलेल्या शिंदी गावात शेतकरी आत्महत्येची हृदयद्रावक घटना समोर आली असून, कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीमुळे एका शेतकऱ्याने आयुष्य संपवले.
शिंदी येथील सुनील उत्तमराव खरात (वय ४५) यांनी दि. १२ जानेवारी रोजी दुपारी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील खरात यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती होती. या शेतीवर भारतीय स्टेट बँकेचे सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज होते.
आईच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली होती. चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन, मूग व उडीद ही पिके पूर्णपणे हातची गेली. उत्पन्न शून्य आणि कर्जावरील व्याज वाढत गेल्याने त्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली.
दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च आणि वाढते कर्ज यामुळे ते मानसिक विवंचनेत होते. याच तणावातून त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाई केली. सुनील खरात यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार असून, या घटनेने शिंदी गावावर शोककळा पसरली आहे.












