चिखली (कैलास आंधळे – बुलडाणा कव्हरेज न्युज) –यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पीक संकटात सापडले असून देऊळगाव घुबे, मेरा बु., कोनड खुर्द आदी परिसरातील शेतांमध्ये हुमनी अळीने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक धोक्यात आले आहे.सद्यस्थितीत अनेक शेतांमध्ये सोयाबीन कोळपिणी किंवा उगम अवस्थेत असून अळीने मुळे आणि खोड खाऊन झाड नष्ट करत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच बाजारात दर घसरलेले असताना आता अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.हुमनी अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून महागडी औषधफवारणी केली जात आहे. मात्र, अपेक्षित परिणाम न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यासंदर्भात शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून तातडीने पाहणी, मार्गदर्शन व पंचनाम्याची मागणी केली आहे.सरनाईक यांनी सांगितले की, “पीक नुकतेच जोमात आलेले असून यावर हुमनी अळीचा प्रकोप झाल्यास संपूर्ण हंगामाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे कृषी शास्त्रज्ञांनी,कृषी विभागाच्या माध्यमातून तत्काळ शेतांवर भेट देऊन उपाययोजना सुचवाव्यात.”त्यांच्यासोबत दत्त घुबे, दीपक जवळे, दीपक घुबे, (देऊळगाव घुबे)आदी शेतकऱ्यांनीही कृषी विभागाकडे मागणी केली आहे की, तातडीने यावर उपाययोजना करून शेतकऱ्यांना सल्ला, औषधांची मदत व नुकसान भरपाईसाठी पंचनामे करावेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळेवर मदत मिळाली नाही, तर आगामी काळात मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल.