सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):सिंदखेडराजा तालुक्यातील दुर्गम भागातील हिवरा गडलिंग गाव अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. हनवतखेड ते हिवरा गडलिंग या रस्त्यावरचा पूल गेली तीन वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहतोय. ग्रामपंचायतीकडून वारंवार पाठपुरावा करूनही काम अद्याप सुरू झालेले नाही.
थोडा जरी पाऊस झाला तरी गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. त्यामुळे रुग्णांना वेळेवर दवाखान्यात नेता येत नाही. परिणामी गंभीर आजार झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते.
गावालगतच बंजारा समाजाचा तांडा असून, तेथे जाणारा रस्ता पावसाळ्यात चिखलमय व जलमय होतो. त्यामुळे लोकांना अक्षरशः शोधून रस्ता काढावा लागतो.
दरम्यान, गावाजवळील तलावाला साळीने छिद्र पडल्याने धोका वाढला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यास तलाव फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते.
हिवरा गडलिंगचे सरपंच व ग्रामस्थांनी शासनाला तातडीने लक्ष देऊन पूलाचे काम पूर्ण करण्यासह तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.