मनुबाई (जि.बुलढाणा ) येथील ग्रामस्थांनी व्यायामशाळा व वाचनालयाच्या रखडलेल्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायत मनुबाई यांना सामूहिक निवेदन सादर केले आहे.

ग्रामपंचायतीमार्फत यापूर्वी व्यायामशाळेसाठी अंदाजपत्रक तयार करून लवकरात लवकर काम सुरू करण्यात येईल, असे लेखी प्रमाणपत्र ग्रामस्थांना देण्यात आले होते. विशेष म्हणजे, व्यायामशाळेस मंजुरी मिळालेली असून संबंधित निधीही ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. मात्र, निधी मिळून सुमारे दोन महिने उलटून गेले तरी अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
या विलंबामुळे गावातील युवक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. “व्यायामशाळेसाठी निधी मिळाल्यानंतरही काम का सुरू झाले नाही? सदर निधी नेमका गेला कुठे?” असा थेट सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
तसेच, वाचनालयासाठी निधी उपलब्ध/मंजूर असतानाही त्या कामालाही सुरुवात न झाल्याने ग्रामविकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाचनालय सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून युवकांच्या बौद्धिक विकासावरही त्याचा परिणाम होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तात्काळ व्यायामशाळा व वाचनालयाची कामे सुरू करण्याची ठाम मागणी केली आहे. अन्यथा पंचायत समिती, गटविकास अधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ कार्यालयांकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
आता ग्रामपंचायत याबाबत कोणती ठोस व पारदर्शक कार्यवाही करते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.













