दुचाकी अडवून तरुणाकडील मोबाईल-रोख रक्कम हिसकावली..! देऊळगाव राजा शहरात पहाटे दरोडेखोरांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज):
शहरातील सातेफळ चौफुली परिसरात पहाटेच्या सुमारास थरारक घटना घडली असून, चार अज्ञात चोरट्यांनी एका युवकाची दुचाकी अडवून त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


सूर्यकांत दिनकर सरोदे (वय २५, रा. पापळ, ता. जाफ्राबाद) हे मित्रासोबत प्रवास करत असताना २५ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास सातेफळ चौफुली परिसरात दोन दुचाकींवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडवली. क्षणातच चोरट्यांनी फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील सुमारे १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच पँटच्या खिशातील पाकीट हिसकावून घेतले.


पाकिटामध्ये १,५०० रुपये रोख रक्कम, आधारकार्ड व वाहनचालक परवाना असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. घटनेनंतर चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.


या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार कांबळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!