दुसरबीड ( बुलडाणा कव्हरेज न्युज) किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीनांविरोधात भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घरात एकटी असताना ही घटना घडली. शेजारी राहणारे दोन अल्पवयीन तिच्या घरी आले.
तक्रारीनुसार, एक अल्पवयीन घराबाहेर लक्ष ठेवत होता, तर दुसऱ्या अल्पवयीनाने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला.घटनेनंतर मुलीने शारीरिक त्रास होत असल्याची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने दुसऱ्या दिवशी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६ व १७ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणातील प्राथमिक साक्ष नोंदविण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे सिंदखेड राजा तालुक्यात खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमधून गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.











