खामगाव :(बुलडाणा कव्हरेज न्युज)दारूच्या नशेत असलेल्या एका इसमाने थेट घरासमोर येऊन पती-पत्नीवर लाकडी काठीने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना १३ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास उमरा (ता. पिंपळगाव राजा) येथे घडली. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सखुबाई महादेव अंभोरे (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील राजू दामोदर वक्ते हा दारूच्या नशेत हातात लाकडी काठी घेऊन त्यांच्या घरी आला. न्यायालयातील प्रकरणे मागे घेण्याची धमकी देत त्याने सखुबाई यांचे पती महादेव मधुकर अंभोरे यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात महादेव अंभोरे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊन एक पाय फ्रॅक्चर झाला आहे.
पतीला वाचवण्यासाठी सखुबाई मध्ये पडल्या असता आरोपीने त्यांनाही ढकलाढकली करत मारहाण केली. या झटापटीत सखुबाई यांच्या गळ्यातील सुमारे तीन ग्रॅम वजनाचे, वीस मण्यांचे मंगळसूत्र तोडून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. न्यायालयीन प्रकरणे मागे न घेतल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८ (१), ३५१ (१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भागवत सहदेव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे












