छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीसोबत दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (१६ मे) गुन्हा नोंदवण्यात आला.
स्वप्निल संतोष चिछित (रा. हिरापूर, चिकलठाणा परिसर) असे मुख्य संशयिताचे नाव असून, त्याच्यासोबत जय संतोष चिछित व दामिनी नावाच्या महिलेचाही गुन्ह्यात समावेश आहे. हे तिघेही हिरापूर येथील रहिवासी आहेत.
तक्रारदार तरुणी नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात राहते. २०२३ मध्ये तिची ओळख स्वप्निलशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे प्रेमसंबंध जुळले. याच दरम्यान, स्वप्निलने तिला लग्नाचे आश्वासन देऊन वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
मात्र, काही महिन्यांपासून तो तिच्या टाळण्यास सुरुवात झाली. जेव्हा तरुणीने लग्नासाठी आग्रह धरला, तेव्हा त्याने सरळ नकार दिला. अखेर गुरुवारी (१५ मे) तरुणीने थेट त्याच्या घरी जाऊन लग्नाची मागणी केली असता, स्वप्निल व त्याच्या कुटुंबीयांनी तिला शिवीगाळ करत धमकावले, असा आरोप तिने केला आहे.
या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.