खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रस्त्यावर दुचाकी उभी करून गोंधळ घालत वाढदिवस साजरा करणाऱ्या दोन तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे दोघे रावण टेकडी परिसरातील रहिवासी आहेत.
सध्या रस्त्यावरच वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढले असून, तरुण मंडळी गोंधळ घालत रस्त्यावरच केक कापतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असाच प्रकार २५ ऑगस्ट रोजी बुलडाणा रोडवरील विजयलक्ष्मी पेट्रोल पंपासमोर घडला.
सुमारे १० ते १५ तरुणांनी रस्त्यावरच दुचाकी उभी करून एका मित्राचा वाढदिवस साजरा सुरू केला होता. यादरम्यान वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. याची माहिती खामगाव ग्रामीण पोलिसांना मिळताच ते लगेच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून काहीजण पळून गेले. मात्र ऋत्विक तेजराव हिवराळे (वय २४) आणि अनिकेत अशोक इंगळे (वय २०) हे दोघे तिथेच मिळाले.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम २८५ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.











