चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यात खरीप पिकांची नोंदणी १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल अॅपद्वारे केली जात आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या गट क्रमांकाजवळ (५० मीटर परिसरात) उभं राहून पिकाचा फोटो काढणे आवश्यक आहे.मात्र, भरोसा शिवारातील भाग १ व भाग २ येथील शेतकऱ्यांना मोठी तांत्रिक अडचण येत आहे. शेतकरी आपल्या शेतात जाऊन नोंदणी करत असताना अॅपवर लोकेशन भरोसा न दाखवता, २०-२५ किलोमीटर दूर असलेल्या भोरसा भोरसी गावाजवळचे भोरसा स्थान दाखवत आहे.
त्यामुळे ई-पीक पाहणी पूर्ण होत नाही आणि शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत आहेत.ही समस्या दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात उद्भवत असून, यावर्षीही ती कायम असल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांसह उपविभागीय अधिकारी शरद पाटील व तहसीलदार यांची भेट घेऊन समस्या मांडली.रब्बीच्या ई-पीक नोदणीसाठी भरोसा शिवारातील शेतकर्यांना जावे लागले होते भोरसा भोरसी गावात!शेतकर्यांना ई-पीक पाहणी करतांना असंख्य तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. रब्बीची ई-पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी काळोना येथील शेतकरी भरोसा शिवारातील स्वतःच्या शेतात पीक पेरा भरण्यासाठी गेले, तेव्हा लोकेशन हे भोरसा दाखवत होते.
त्यामुळे स्वतः च्या शेतात नोंदणी होऊ शकली नव्हती, ही समस्या सुटली नसल्याने या शिवारातील सर्वच शेतकर्यांना २० ते २५ किलोमीटर अंतर असलेल्या भोरसा भोरसी गावालगतच्या भोरसा शिवारात जाऊन ई-पीक पाहणी करावी लागली होती. मात्र अशी जर दुसर्या गावात जात नोंदणी करावी लागत असेल तर हे अॅप आमच्या मुळावर उठल्याची भावना शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. तर आमची समस्या कायमची सोडवा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
सरनाईक यांनी मागणी केली की –अॅपमधील तांत्रिक बिघाड दूर करून लोकेशनमध्ये भरोसा नाव दिसावे.शेतकरी ई-पीक पाहणीपासून वंचित राहू नयेत.तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळी जाऊन नोंदणी करण्याचे आदेश द्यावेत.उपविभागीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, यावर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरनाईक यांनी दिला.या वेळी अॅड. गणेश थुट्टे, एकनाथ उसर, मधुकर उसर, संजय उसर, दिनकर उसर, भगवान शिंदे, प्रविण उसर, ज्ञानेश्वर उसर, अशोक उसर, सचिन उसर यांसह शेतकरी उपस्थित होते.
















