अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असोला परिसरात एका ३३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असोला येथे वास्तव्यास असलेली पीडिता ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपासून ते ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान केरकचरा टाकण्यासाठी घराजवळील उकिरड्यावर गेली होती. त्यावेळी तेथे टाकण्यात आलेल्या दगडांबाबत तिने जाब विचारला असता, बाजूला क्रिकेट खेळत असलेल्या एका इसमाने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर गंभीर प्रकारात होत आरोपीने वाईट उद्देशाने पीडितेचा हात धरून तिचा विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडितेस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेप्रकरणी पीडितेने अंढेरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ई-साक्षही नोंदविण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.











