अंढेरा फाट्यावर माल वाहक ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) मलकापूर–सोलापूर महामार्गावर अंढेरा फाट्याजवळ असलेल्या धोकादायक वळणावर मालवाहू ट्रक उलटून भीषण अपघात झाला. हा अपघात शनिवार, २० डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडला.


चिखलीकडून जालन्याकडे लोखंडी पोल घेऊन जाणारा मालवाहू ट्रक (एमएच १२ एसएक्स ३७७२) अंढेरा फाट्यावरील वळणावर आला असता पोलचा तोल गेला आणि ट्रक थेट महामार्गावर उलटला. अपघातात ट्रक चालकाचा हात फ्रॅक्चर झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर ट्रक व लोखंडी पोल रस्त्यावर आडवे पडल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तेथून जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ चालकाला ट्रकच्या केबिनमधून बाहेर काढले.


घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका बोलावून जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, अंढेरा येथील माजी सरपंच संतोष नागरे यांच्या मदतीने जेसीबीद्वारे रस्त्यावर पडलेले लोखंडी पोल बाजूला काढण्यात आले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या कारवाईत नितीन पुसे, पंढरी नेमाने, गोरख राठोड, मदन विभुते, विलास मानवतकर यांनीही सहकार्य केले.


अंढेरा फाट्यावरील हे वळण अपघातप्रवण असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!