मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – मेहकर शहरात २१ नोव्हेंबर रोजी दुपारी धाडसी चोरीची घटना घडली. सोयाबीन व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून गाडीत ठेवलेली अडीच लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकारामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सायाळा (ता. सिंदखेड राजा) येथील समाधान शंकर जाधव हे सोयाबीन व्यापारी आहेत. २१ नोव्हेंबर रोजी त्यांनी ब्राह्मण चिकना येथील शेतकऱ्याकडून ४० क्विंटल सोयाबीन खरेदी करून मेहकरमध्ये आले. दुपारी त्यांनी डोणगाव रोडवरील एचडीएफसी बँकेतून अडीच लाख रुपये काढले. त्याच वेळी त्यांच्या कारचे चाक पंक्चर झाले होते. त्यांनी मँगो हॉटेलजवळ पंक्चर दुरुस्ती करून घेतली.
यानंतर ते पुन्हा ब्राह्मण चिकना येथे जाण्यासाठी शहरात आले आणि बुलढाणा अर्बन बँकेसमोर कार पार्क करून कर्जाविषयी माहिती घेण्यासाठी बँकेत गेले. गाडीमध्ये ड्रायव्हर सीटजवळ अडीच लाखांची थैली ठेवलेली होती.
दुपारी ३.१० ते ३.२० या दहा मिनिटांच्या आत अज्ञात चोरट्याने संधी साधत ड्रायव्हर बाजूचा काच फोडला आणि थैली घेऊन पसार झाला. चोरी लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
समाधान जाधव यांनी मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे. चोरट्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.














