धामणगाव बढे (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील पोफळी शिवारात जुन्या वादाच्या कुरापतीतून ३२ वर्षीय तरुणाला लाठ्याकाठ्या आणि लोखंडी आसारीने बेदम मारहाण करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणाचे नाव अनिकेत ऊर्फ गणेश निवृत्ती सुरडकर (वय ३२, रा. पोफळी) असे आहे. अनिकेत आणि आरोपी हे एकाच गावातील रहिवासी असून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. हा वाद वाढत जाऊन अखेर त्याचे रूपांतर भीषण घटनेत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोफळी शिवारातील विलास राजाराम चौधरी यांच्या शेतात आरोपींनी अनिकेतला गाठले. यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला.
लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण…
आरोपींनी अनिकेतवर लाठ्याकाठ्या आणि लोखंडी आसारीने अमानुष मारहाण केली. त्याच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर आणि पायावर जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. मारहाण इतकी जबर होती की अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पाच आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल…
याप्रकरणी मृताचा चुलत भाऊ विजय आमराव सुरडकर (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलीस ठाण्यात ब्रम्हानंद ऊर्फ धम्मा राजाराम सुरडकर, लकी ऊर्फ प्रफुल्ल संतोष इंगळे, कृणाल जानराव सुरडकर, निलेश बाळ बोदडे आणि क्रिष्णा रमेश अंभोरे या पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोफळी गावात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.














