Advertisement Advertisement

शेतकरी प्रश्नांवर रविकांत तुपकरांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट;दुष्काळाच्या दाहकतेसह कर्जमाफी, वीज अन् पीक विम्याचा मुद्दा ‘कॅबिनेटमध्ये शेतकरी प्रश्न लावून धरा’, तुपकरांची मागणी…..

मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज)राज्यातील शेतकरी गंभीर संकटातून जात असताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. पावसाचा खंड, माना टाकलेली सोयाबीनची पिके आणि त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती याची दाहकता तुपकरांनी दोन्ही मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे तुपकर आता सरकारसोबत थेट संवाद साधत या प्रश्नांवर ठोस निर्णयासाठी पाठपुरावा करत आहेत. मुंबईतील या भेटीत त्यांनी सध्याची परिस्थिती केवळ प्रशासकीय अहवालांमधून नव्हे, तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अनुभवातून मंत्र्यांसमोर मांडली.

पावसातील मोठ्या खंडामुळे सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने राज्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तुपकरांनी केली. शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज उपलब्ध करून देणे, जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलणे आणि पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावणे, या मागण्याही त्यांनी मंत्र्यांसमोर मांडल्या.

शेतकऱ्यांच्या कर्जाच्या प्रश्नावरही तुपकरांनी सरकारचे लक्ष वेधले. सरसकट कर्जमाफी करावी, २०१९ पूर्वीच्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

कर्ज पुनर्गठन आणि रूपांतरित कर्जधारकांनाही मदतीच्या कक्षेत आणावे, तसेच कर्जाच्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांचा सिबिल खराब होऊन भविष्यातील कर्जाचा मार्ग बंद होऊ नये, यासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी केली.यासाठी मुख्यमंत्र्यांनी आरबीआय सोबत चर्चा करून बँकांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी भूमिका तुपकरांनी मांडली. ट्रॅक्टर, स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचनासाठी महाडीबीटीच्या माध्यमातून मंजूर झालेले मात्र अद्याप रखडलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे, हा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला.

‘कॅबिनेटमध्ये शेतकरी प्रश्न लावून धरा’ व सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडा….

या सर्व प्रश्नांवर आगामी कॅबिनेट बैठकीत ठोस आणि सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी ‘कॅबिनेटमध्ये शेतकरी प्रश्न लावून धरा आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्या,’ अशी स्पष्ट मागणी रविकांत तुपकरांनी तिन्ही मंत्र्यांकडे केली.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे तुपकरांनी सांगितले. मात्र, सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून सरकारने निर्णय घेण्यास विलंब करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दुष्काळ आणि इतर प्रश्नांमुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर राज्यातले शेतकरी मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत. सरकारने हा असंतोष गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांचा संयम तुटण्याची वाट पाहू नये, अशी स्पष्ट भूमिका तुपकरांनी मांडली.

शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष किती मोठा आहे, याची जाणीव सरकारला असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून सरकारने संकटातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी तुपकरांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!