बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलडाणा शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे नगरसेवक आकाश विजय दळवी यांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शिवीगाळ, मारहाण, धमकी तसेच शस्त्रासारख्या वस्तू दाखवून दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ सप्टेंबर रोजी रात्री कारंजा चौक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास नगरसेवक आकाश दळवी हे कारंजा चौक परिसरातील दुर्गादेवी मंदिरात आरतीसाठी गेले होते. त्यावेळी निखिल शर्मा, आर्यन निखिल शर्मा आणि वंश निखिल शर्मा तेथे आल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी ‘तू आमदार श्वेता महाले यांच्या भरोशावर जास्त उड्या मारतो का?’ अशा आशयाचे बोलून शिवीगाळ केल्याचा आरोप दळवी यांनी केला आहे.
यानंतर वाद वाढला आणि संबंधितांनी मारहाण करण्यासाठी पुढे आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी दळवी यांच्यासोबत असलेले तिलक दीपक तोंडीलायत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
घराबाहेर बोलावून शस्त्रे दाखवल्याचा आरोप…
तक्रारीनुसार, कारंजा चौकातील वादानंतर हा प्रकार तिरुपती मंगल कार्यालयासमोरील परिसरापर्यंत गेला. तेथे पुन्हा शिवीगाळ करून घराबाहेर बोलावण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधितांनी घरातून बाहेर येत काळ्या रंगाची बंदुकीसारखी वस्तू, लोखंडी रॉड आणि लोखंडी तलवार हातात घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी ‘मर्डर काय असतो, तुला आजच दाखवतो’ तसेच ‘तुला तुकडे करून कारंजा चौकात फेकतो’ अशा आशयाच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप नगरसेवक आकाश दळवी यांनी केला आहे. या घटनेनंतर दळवी हे तिलक तोंडीलायत यांच्यासह बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले.
आमदार गायकवाड-महाले वादाच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण…..
या घटनेला राजकीय संदर्भ मिळण्याचे कारण म्हणजे बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्यात मागील काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप. त्यातच भाजप नगरसेवकाला धमकी देताना आमदार श्वेता महाले यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आल्याने प्रकरणाची राजकीय चर्चा आणखी रंगली आहे.
तक्रारीत तिघे साक्षीदार…..
या घटनेचे साक्षीदार म्हणून पंकज परसराम शिंदे, अमोल सुभाष जगताप आणि राजगुरे यांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत. त्यांनी संपूर्ण प्रकार पाहिल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
दरम्यान, बुलडाणा शहर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, नगरसेवकाच्या तक्रारीत आमदार श्वेता महाले यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने बुलडाणा शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












